उद्दिष्ट.
"मराठी ई-पुस्तकांची निर्मिती व वितरणास उत्तेजन देणे"
|
|
|
मराठीत असलेले खुले व अभिजात वाङ्मय लोकांना मुक्तपणे वाचता
यावे, त्याचा मुक्तपणे प्रसार व्हावा या करिता आम्ही
पुढाकार घेत आहोत. या योजनेत ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसुत, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, किर्लोस्कर, देवल, राजवाडे, ह.ना. आपटे इत्यादिंचे साहित्य लोकांना उपलब्ध करून देण्याची योजना आहे.
ई-पुस्तकांची निर्मिती करणे आणि ती वितरित करणे हे प्रामुख्याने यात घडेल.
लेखाधिकार कायद्याचा (copyright
act) पूर्ण विचार करूनच हे केले जाईल. मराठीत अभिजात
तरीही दुर्मिळ आणि खुले (लेखाधिकार कायदामुक्त) असे भरपूर साहित्य आहे. ते दुकानात फारसे उपलब्ध नाही. काही नावाजलेली
वाचनालये सोडल्यास, वाचण्यासाठी हे साहित्य
जवळपास उपलब्ध नाही. या चळवळीच्या माध्यमातून या साहित्याची उपलब्धता वाढेल असे
आम्हाला वाटते.
लोकचळवळ
ही एक लोकचळवळ असावी असे
आम्हाला वाटते. मराठी एवढी समृद्ध भाषा आहे की कोणा एका दोघांना हे कार्य करत
येणार नाही. या साठी समाजातील
सर्वसामान्यांचा, अभिजनांचा, लोकसंस्थांचा, शासनाचा, साहित्यिकांचा सहभाग अपेक्षित आहे. हे कार्य अखंडितपणे कित्येक वर्षे चालू
शकेल एवढे मोठे आहे. तेंव्हा असा सह्भाग सातत्याने होणे गरजेचे आहे. आम्हाला अशी
आशा आहे की हे सर्व घडेल व ही चळवळ सातत्याने काम करून खूप पुस्तके लोकांसमोर
आणेल.
मुद्रित साहित्य
छापलेल्या पुस्तकांच्या
माध्यमातून यातील काही साहित्य पुन्हा लोकांसमोर आणले गेले आहे. ई-पुस्तक हे कधीच
छापलेल्या पुस्तकापेक्षा जास्त सोयिस्कर नसते. वाचताना आपण सहज मागचे पान उघडून
बघतो, सहज चाळतो, वाटेल तसे बसून वा
झोपूनसुद्धा वाचतो, पुस्तक कुठेही घेऊन जातो हे
सर्व ई-पुस्तकात करता येत नाही. हे सर्व करायचा आनंद घेण्यासाठी छापलेली पुस्तके
आपण नेहमीच विकत घेत राहू. ई-पुस्तकांच्या
या चळवळीने छापलेल्या पुस्तकांना आव्हान उभे न राहता ती त्यास पूरक ठरतील असे
आम्हाला वाटते.
आजवर अनेक प्रकाशनसंस्थांनी
अभिजात व खुले साहित्य छापलेले आहे. त्यात शासकीय संस्थांचा सहभाग मोठा आहे. खाजगी प्रकाशकांमध्ये वरदा प्रकाशनाने हल्ली
काही पुस्तके प्रकाशित केली आहेत. . अनेक प्रथितयश प्रकाशनांनी वेळोवेळी अशी पुस्तके
छापली आहेत. याशिवाय धार्मिक चळवळींनी आणलेले संत साहित्य व इतिहासप्रेमींनी
केलेले कार्य उल्लेखनीय आहे. ई-पुस्तकांची निर्मिती ही याच कार्याचा एक भाग आहे
असे संबंधित लोक समजतील अशी आशा वाटते.
ई-पुस्तके
प्रत्येक माध्यमाचे स्वत:चे
काही सामर्थ्य असते. ई-पुस्तके ही छापलेल्या पुस्तकांचा गोडवा आणू शकणार
नाहीत. पण अभ्यासू वाचकांना 'शोध' (search) प्रक्रियेमुळे एक नवे तंत्र
उपलब्ध होईल. जसे तुकाराम गाथा, वा ज्ञानेश्वरी सारख्या
ग्रंथातील एखादी ओळ वा तिचा भाग भाग आठवत असेल तर पूर्ण ओवी/अभंगापर्यंत पोचणे हे
मुद्रित साहित्यात जिकिरीचे काम असते. पण ते ई-पुस्तकात सहज शक्य असते. 'प्रत-प्रतिप्रत' (copy-paste) तंत्रज्ञानामुळे लेखकांना
साह्य होईल. ई-पुस्तकांना शेल्फ सारखी
जागा लागत नाही.
ई-पुस्तकांची निर्मिती ही कमी
खर्चाची आहे. संगणक व तो चालवण्याचे ज्ञान
असलेला कोणीही ते करु शकतो. कागद, छपाई यामधे एक कमीत कमी प्रतींचे अर्थकारण असते. ते ई-पुस्तकांमध्ये नसते. एक
सर्वसाधारण संगणक, थोडे चालवावयाचे ज्ञान व इच्छाशक्ति या बळावर कोणीही निर्मिती प्रक्रियेत
सहभागी होऊ शकतो. एकेकट्याने एखादे पुस्तक पूर्णपणे निर्माण करणे सहज शक्य आहे. हे
ज्यांना जड जाईल असे वाटते त्यांनी काहीजण मिळून या पुस्तकांची निर्मिती
करावी. किंवा एखादा भाग करावा.
पुढची दिशा :
या उपक्रमाला अजून बराच मोठा
पल्ला गाठायचा आहे. पण मराठीतील समृद्ध व दुर्मिळ वाङ्माय पाहता या चळवळीची पुढची पावले
वेगवेग़ळ्या क्षेत्रात पडु शकतील. मराठीत
असे अनेक ग्रंथ आहेत की जे मुद्रितावस्थेत गेलेले नाही. आज हस्तलिखितांच्या
स्वरुपात ते अतिशय दुर्मिळ अवस्थेत आहेत.
अशा ग्रंथांना स्कॅनिंग तंत्र वापरून ई-पुस्तकांमधे आणता येईल. इतिहासप्रेमी व इतिहासतज्ञांचा यात मोठा हातभार
लागू शकतो.
साहित्यच्या नवा मंच : नेट-
|
अशी बरीच पुस्तके आहेत की जी
आज लेखाधिकार कायद्याच्या कक्षेत आहेत पण त्यांची आवृत्ती संपली आहे (out of print).
अशा पुस्तकांचे
प्रकाशन करणे परवडत नसल्याने ती मुद्रित अवस्थेत येण्याची शक्यता कमी आहे. अशा
पुस्तकांचे ई पुस्तकात रुपांतर होऊ शकते. व वाचकांना ती उपलब्ध होऊ शकतात. याशिवाय काही जणांना स्वतंत्र रित्या नवीन
ई-पुस्तक लिहावे असे वाटू शकते, किंवा मुद्रित प्रकाशनाला
पूरक असे ई-पुस्तकांचे प्रकाशन होऊ शकते.
निर्मितीचे स्वरूप
यात तीन टप्पे आहेत. पहिल्या
टप्यात आपण निर्मितीक्षम बनतो, दुसर्या टप्यात पहिला खर्डा
बनतो. तर तिसर्या टप्यात त्यात
मुद्रितशोधन (proof reading and
correction) होऊन पूर्णनिर्मित पुस्तक तयार होते.
निर्मितीक्षम बनणे
आपला संगणक आपणच कोणाच्याही
मदतीशिवाय मराठीसाठी उपयुक्त बनवू शकता.
यासाठी काय करायचे त्याची माहिती
आम्ही इतरत्र देत आहोत. थोड्या खटपटीनंतर
तुम्ही टायपिंग करु लागाल. पहिल्यांदा हे
काम जिकिरीचे वाटते पण हळूहळू त्याची सवय होते. एवढे झाले की तुम्ही ई-पुस्तकांची
निर्मिती करु शकता.
पहिला खर्डा
पुस्तक मुळाबरहुकुम टाईप करणे
हा यातला दुसरा टप्पा आहे. हा सर्वात
महत्वाचा टप्पा आहे. या प्रक्रियेत जेवढया
कमी चुका होतील तेवढे बरे. त्यासाठी योग्य ती काळजी घेत व नेटाने हे काम करावे
लागते. रोज काहीतरी मजकूर करणे, केलेला मजकूर परत वाचून
त्याची पडताळणी करणे हे नियमितपणे केल्यास, रोज एक तास वेळ दिल्यास शंभर पानाचे पुस्तक
साधारणपणे महिनाभरात तयार होऊ शकते (तीन चार पाने रोज). इतर अडचणी व सुरुवातीचा शिक़ण्याचा काळ धरला तर
हा काळ दोन महिन्यांपर्यंत जाऊ शकतो.
मुद्रितशोधन
आपण जरी काळजीपूर्वक काम केले
असले तरी काही चुका राहून जाऊ शकतात. यासाठी कधी दोनदा मुद्रितशोधनाची गरज पडू
शकते. हे काम अनुभवाने शिकता येते. याबद्दलची माहिति आम्ही संकलीत करून देण्याचा
प्रयत्न करू. या टप्यानंतर तयार झालेले साहित्य माहितीजालावर प्रकाशित करण्यासाठी
वापरता येईल.
अपेक्षित मदत व मदत करणार्यांना त्याचे फायदे.
आर्थिक मदत
ही मदत करणारे, आर्थिक मदत करुन कुठल्याही पुस्तकाची निर्मिती करु शकतील. ज्यांनी अशी मदत केली त्यांचे ऋण त्या
ई-पुस्तकात मांडले जातील. हे ऋण जाहिरात स्वरुपाचे नसले तरी लोक ते वाचतील असे
लिहिले जातील. यामुळे दात्याचे नाव नेहमीच
लक्षात राहील. ही मदत मिळाल्यावर
ई-पुस्तकाची निर्मिती व्यावसायिकांकडून केली जाईल व त्यावर येणार्या खर्चाची
पोचपावती दिली जाईल. याशिवाय माहितीजालावरील संकेतस्थळासाटी (website) किंवा व्यवस्थापन खर्चासाठी मदत करता येईल. ही मदत करणार्यांचे ऋणनिर्देश संकेतस्थळी दिले
जातील.
निर्मित्तीत सहभाग
निर्मितीत सहभाग करुन एखाद्या
पुस्त्काची निर्मिती करणे हे या चळवळीतले मुख्य कार्य आहे. तेव्हा अशा सहभागी सदस्यांचे ऋणनिर्देश
ई-पुस्तकात विशेष करून दिले जातील. त्यांच्या छायाचित्रासोबत हे ऋणनिर्देश केले
जातील.
पुस्तके निवडणे व उपलब्ध करुन देणे
हे महत्वाचे कार्य करणार्यांचे
ऋणनिर्देश ई-पुस्तकात व/वा संकेतस्थळी दिले जातील. यासाठी, ई-पत्र, दूरध्वनी वा प्रत्यक्ष भेटीद्वारे मदत अपेक्षित आहे.
व्यवस्थापकीय जबाबदार्या व निर्णय प्रक्रियेत सहभाग
हे महत्वाचे कार्य करणार्यांचे
ऋणनिर्देश ई-पुस्तकात व/वा संकेतस्थळी दिले जातील.
तंत्रज्ञानाची मदत
हे महत्वाचे कार्य करणार्यांचे ऋण, संकेतस्थळी केले जातील.
पुस्तकाची ओळख लिहिणे, मुखपृष्ट तयार करणे.
ई-पुस्तकाला चांगले मुखपृष्ट
असावे. तसेच त्याची ओळख ही करुन द्यावी असे यात अभिप्रेत आहे. यामुळे पुस्तक दर्शनी उठावदार होईल. हे करणार्यांचे
ऋणनिर्देश ई-पुस्तकात विशेष करून दिले जातील.
या प्रकल्पांतर्गत खालील पुस्तकांचे
काम सुरू झाले आहे.
1. संगीत शारदा : लेखक - गोविंद्
बल्लाळ देवल
2. मनाचे श्लोक : कवी - संत रामदास
3. भारतीय विवाह संस्थेचा इतिहास -
लेखक - वि.का.राजवाडे
4. गावगाडा : लेखक - त्रिंबक
नारायण आत्रे.
5. स्त्री पुरुष तुलना : लेखिका :
ताराबाई शिंदे
6. संगीत शाकुंतल : लेखक - अण्णासाहेब किर्लोस्कर
7. समग्र केशवसूत : कवी - केशवसूत.
8. महाराष्ट्रगीत - कवी - कोल्हटकर
9 यमुनापर्यटन : लेखक - बाबा पदमजी
10. समग्र बालकवी - कवी - बालकवी
11 फुले समग्र वाङ्मय - लेखक -
महात्मा जोतिबा फुले.
स्त्रोत आणि अधिक माहिती साठी : http://www.marathipustake.org/